वॉशिंग्टन : अमेरिका आणि इस्रायलने बुधवारी दक्षिण इराणमधील असलुयेह शहरातील साउथ पार्स गॅस क्षेत्र आणि तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ले केले. साउथ पार्स हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र मानले जाते. यानंतर इराणने सौदी आणि कतारमधील उर्जा आणि गॅस प्रकल्पाची राख करू असा इशारा दिला होता. यानंतर हा इशारा सत्यात उतरवत बुधवारी रात्री इराणने कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर, रास लाफानवर, क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यामुळे भीषण आग लागली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन पथके तात्काळ पाठवण्यात आली. कतारने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. दरम्यान इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हात झटकताना मला काहीच माहीत नसल्याचे म्हटलं आहे. या विशिष्ट हल्ल्याबद्दल अमेरिकेला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असाही दावा केला आहे. आता इस्त्रायलकडून 'साउथ पार्स' क्षेत्रावर कोणताही पुढचा हल्ला केला जाणार नाही, असे सांगत इराणला पुन्हा कतारवर हल्ला करू नये, असा गर्भित इशारा दिला आहे.
प्रत्येक रक्ताला किंमत असते, इराणचा इशारा
गॅस प्रकल्पावरील हल्ल्यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराणने नागरिक आणि महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करून "रेड लाइन ओलांडली" आहे. कतारने म्हटलं आहे की, अशा हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशातील परिस्थिती चिघळू शकते आणि म्हणूनच, सर्व देशांनी तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता टिकवण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे. दरम्यान, इराणचे नवीन सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी यांनी सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. खामेनी यांनी इशारा दिला आहे की, "प्रत्येक रक्ताला किंमत असते."
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
दरम्यान, ट्रम्प यांनी यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं आहे की, "मध्यपूर्वेत जे काही घडलं, त्या रागातून इस्त्रायलने इराणमधील 'साउथ पार्स गॅस फिल्ड' या महत्त्वाच्या केंद्रावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात त्या केंद्राचा एक छोटा भाग बाधित झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या विशिष्ट हल्ल्याबद्दल अमेरिकेला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. तसेच, कतार या देशाचा या हल्ल्याशी दुरान्वयेही संबंध नव्हता, की त्यांना याची पुसटशी कल्पना होती. दुर्दैवाने, इराणला ही वस्तुस्थिती माहित नव्हती. त्यामुळे इराणने विनाकारण आणि अन्यायकारक पद्धतीने कतारच्या 'एलएनजी गॅस' सुविधेवर हल्ला केला.
'साउथ पार्स' क्षेत्रावर पुन्हा हल्ला केला जाणार नाही
आता इस्त्रायलकडून 'साउथ पार्स' क्षेत्रावर कोणताही पुढचा हल्ला केला जाणार नाही. पण, जर इराणने पुन्हा एकदा कतारसारख्या निष्पाप देशावर हल्ला करण्याचा चुकीचा निर्णय घेतला, तर अमेरिका स्वतः (इस्त्रायलच्या मदतीशिवाय किंवा संमतीशिवाय) इराणच्या संपूर्ण 'साउथ पार्स गॅस फिल्ड'ला अशा ताकदीने उडवून देईल, जी इराणने याआधी कधीही पाहिली नसेल. मला अशा प्रकारचा हिंसाचार किंवा विनाश करायचा नाही, कारण त्याचे इराणच्या भविष्यावर दीर्घकालीन परिणाम होतील. पण जर कतारच्या गॅस सुविधेवर पुन्हा हल्ला झाला, तर मी मागेपुढे पाहणार नाही.
इराणमधील जगातील सर्वात मोठ्या गॅस क्षेत्रावर हल्ला
दरम्यान, इस्त्रायलनं दक्षिण इराणमधील असलुयेह शहरातील साउथ पार्स गॅस क्षेत्र आणि तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ले केले.या हल्ल्यात गॅससोबतच पेट्रोकेमिकल आणि तेल पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले होते. इस्रायली माध्यमांनी बुशेहर प्रदेशातील एका गॅस सुविधेवर हल्ला झाल्याचेही वृत्त दिले आहे. यापूर्वी, इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले होते की, आज इराण आणि लेबनॉनमध्ये "मोठे अनपेक्षित हल्ले" अपेक्षित आहेत, ज्याचा संबंध या हल्ल्यांशी जोडला जात आहे. याला प्रत्युत्तर म्हणून, इराणने आखाती देशांमध्ये मोठ्या हल्ल्यांचा इशारा दिला होता. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने लोकांना सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतारमधील प्रमुख तेल आणि वायू प्रकल्पांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.